Thursday, November 25, 2010

कुठेही धूम्रपान कराल, तर गुरुजी देतील 'छडी'

सावधान! तुम्ही सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करत असाल तर अगदी शिक्षक किंवा पोस्टमास्तरदेखील तुम्हाला दोनशे रुपयांचा दंड करू शकतात... मात्र दुर्दैवाने आपल्याला मिळालेल्या या लक्षणीय अधिकारांची जाणीवच या बिचाऱ्या शिक्षकांना किंवा पोस्टमास्तरांना नाही!

थोड्याथोडक्‍या नव्हे, तब्बल सात वर्षांपूर्वीच केंद्र सरकारने एका अध्यादेशाने हा अधिकार या मंडळींना दिला आहे. केवळ शिक्षक अथवा पोस्टमास्तरच नव्हे, तर ग्रंथपाल, रेल्वे- विमानतळावरील अधिकारी हेदेखील दंडाची कारवाई करू शकतात.

अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) सहायक आयुक्त चंद्रशेखर साळुंके म्हणाले, ""केंद्र आणि राज्य सरकारमधील सर्व राजपत्रित अधिकारी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड आकारू शकतात, असा अध्यादेश मागील सात वर्षांपूर्वीच आला आहे. मात्र या अध्यादेशाबाबत संबंधित राजपत्रित अधिकाऱ्यांनाच माहिती नाही.''

'धूम्रपान निषिद्ध'
सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही व्यक्तीकडून धूम्रपान होणार नाही, याची दक्षता घेण्याचे बंधन संबंधित आस्थापनांचे मालक, व्यवस्थापक किंवा प्राधिकृत अधिकाऱ्यांवर आहे. तसेच "धूम्रपान निषिद्ध' असा फलक लावण्याचीही सक्ती आहे. ऍश ट्रे, काडेपेटी, लायटर आदींचा पुरवठा सार्वजनिक ठिकाणी होता कामा नये; तसेच या कायद्याचे उल्लंघन होत असेल, तर कोणत्या व्यक्तीकडे तक्रार करता येते, अशाही मजकुराचा फलक लावणे बंधनकारक असल्याचे अध्यादेशात म्हटले आहे, अशी माहिती साळुंखे यांनी दिली. धूम्रपान करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार अधिकारी पोलिस आणि अन्न-औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनाच असतात, असा समज आहे. अगदी राजपत्रित अधिकाऱ्यांनाही याची पुसटशी कल्पना नाही, असेही ते म्हणाले.

यांना आहेत दंडाचे अधिकार
- प्राप्तिकर, विक्रीकर, आरोग्य विभागातील निरीक्षक
- रेल्वे विभागातील स्टेशनमास्तर, स्टेशनप्रमुख
- केंद्र आणि राज्य सरकारचे सर्व राजपत्रित अधिकारी
- आरोग्य संचालक, वैद्यकीय अधीक्षक, रुग्णालय प्रशासक
- पोस्टमास्तर
- महाविद्यालय, शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल
- विमानतळ व्यवस्थापक, विमानतळ कंपन्यांचे अधिकारी.

(स्त्रोत: इसकाळ)