Friday, September 23, 2005

आपल्याजवळ दहा मिनिटे आहेत का?

आपल्याजवळ दहा मिनिटे आहेत का?
तुम्ही तुमच्या देशासाठी दहा मिनिटे देऊ शकता का? जर हे शक्य असेल, तर पुढील मजकूर वाचा : तुम्ही म्हणता की, आपले सरकार अकार्यक्षम आहे. तुम्ही म्हणता की, आपले कायदे फारच जुनेपुराणे, म्हणून कालबाह्य झाले आहेत. तुम्ही म्हणता की, महानगरपालिका कचऱ्याचे ढिगारे उचलण्यात दिरंगाई करते. तुम्ही म्हणता की, फोन काम करत नाहीत. रेल्वेसेवा म्हणजे मोठा विनोद आहे. विमानसेवा ही जगातील अत्यंत भिकार सेवा आहे आणि पत्र पत्त्यावर कधीही पोचत नाहीत. तुम्ही म्हणता की, आपला देश खड्ड्यात गेला आहे. तुमचे हे रडगाणे सतत चालू असते; पण याबाबत सुधारणा व्हावी, यासाठी तुम्ही स्वत: काय करता? आपले कोडकौतुक केले जावे, अशा आशेने आपण आरामात हे सारे अलिप्तपणे बघत बसतो आणि आपण काहीही न करता, सरकारने सर्व काही केले पाहिजे अशी आपली अपेक्षा असते. सरकारने सर्वत्र स्वच्छता राखावी, अशी आपली अपेक्षा असते; पण कचरा-घाण इतस्तत: टाकण्याची एकही संधी आपण सोडत नाही किंवा वाटेत पडलेला कागदाचा एकही कपटा उचलून कचरापेटीत टाकत नाही. रेल्वेने स्वच्छ प्रसाधनगृहे पुरवावीत, अशी आपली अपेक्षा असते; पण या प्रसाधनगृहांचा योग्य प्रकारे कसा वापर करावा, हे शिकावेसे आपणाला कधीही वाटणार नाही. इंडियन एअरलाइन्स व एअर इंडियाने सवोर्त्तम जेवण व प्रसाधने पुरवावीत, असे आपल्याला वाटते; पण भुरट्या चोऱ्या करण्याची एकही संधी आपण कधी सोडत नाही. मग आपण काय सबब देतो? ही संपूर्ण व्यवस्थाच आमूलाग्र बदलायला हवी. मग या व्यवस्थेचा कायापालट करणार तरी कोण? आणि या व्यवस्थेचे घटक तरी कोणते? आपण आपल्या सोयीनुसार असे समजतो की, या व्यवस्थेत शेजारीपाजारी, अन्य कुटुंबीय, इतर शहरवासी, अन्य जातीजमाती आणि सरकार यांचा अंतर्भाव असतो. मात्र या व्यवस्थेत तुमचा व माझा काहीही संबंध नाही. या व्यवस्थेत खरोखरच काहीतरी सुधारणा, विधायक योगदान करण्याची जेव्हा पाळी येते, तेव्हा आपण आपल्याला आपल्या कुटुंबासह एका सुरक्षित कोशात कोंडून घेतो आणि दूरवरच्या अन्य देशांकडे बघत बसतो किंवा कोणी 'मिस्टर क्लीन' येईल आणि जणू जादूची कांडी फिरवून सारे कसे स्वच्छ करील, अशी वाट पाहत बसतो. प्रिय भारतीयांनो, तुमचा हा उद्वेग खूपच विचारप्रवर्तक आहे आणि तो आपणाला अंतर्मुख करायला भाग पाडणाराही आहे. तसेच तो आपल्या सदसद्विवेकबुद्धीला टोचणी लावणाराही आहे. जॉन एफ. केनेडी यांनी आपल्या देशवासीयांना उद्देशून केलेल्या भाषणाची आठवण मी तुम्हाला करून देऊ इच्छितो. ते म्हणाले होते, 'आपला देश आपल्यासाठी काय करू शकतो, हे विचारू नका, तर आपण आपल्या देशासाठी काय करू शकतो, हे स्वत:ला विचारा.' भारताच्या प्रथम नागरिकांच्या दहा मिनिटांच्या संदेशाने आम्हाला आमच्या युवा वाचकांसाठी हे जीवनचरित्र प्रकाशित करण्याची प्रेरणा दिली. आम्हाला आशा आहे की, ते आपल्या जीवनातील अत्यंत रमणीय अशा काळात डॉ. कलाम यांच्या सदाबहार, प्रेरणादायी संदेशातून प्रेरणा घेतील आणि 'स्वप्ने पाहा, स्वप्ने पाहत राहा, स्वप्ने विचारात रूपांतरित होतील आणि विचार कार्यरूपाने साकारतील.'

- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम